मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ते, गल्ल्यांमध्ये पाणी साठले आहे. यांदरम्यान भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणेमध्येही रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उत्तर खाडीमध्ये दबावाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे जोरदार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील चार ते पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अॅलर्ट असेल. तर मुंबई, ठाण्यात रविवारी रेड अलर्ट असेल.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जोरदार पावसाची स्थिती पुढीच पाच दिवस कायम राहील. मुंबई आणि राज्याच्या इतर भागातही नागरिकांनी परिस्थिती पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत शनिवारी आणि पुढच्या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत, १४ आणि १५ जून रोजी ऑरेज अॅलर्ट करण्यात आला आहे. आज दुपारी १.३० वाजता समुद्रात ४.३४ मीटर उंचीच्या जोरदार लाटा उसळण्याची शक्यता आहे.
ही स्थिती पाहता बेस्टसह सर्व नागरिक नियंत्रण कक्षांना हाय अॅलर्ट जारी केला आहे. तटरक्षक दल, नौसेना आणि एनडीआरएफलाही तयार राहण्यास सांगितले आहे.