चेन्नई : तामीळनाडूत कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता एम. के. स्टॅलिन सरकारने राज्यात लॉकडाऊन २१ जूनपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. मात्र, निर्बंधांमध्ये आणखी काही सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यासोबतच राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये सरकारतर्फे संचलित वाईन शॉप सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुली करण्यास मंजुरी देण्यात आली.
तामीळनाडूत आज कोरोनाचे १५ हजार ७५९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या वाढून २३ लाख २४ हजार ५७९ झाली आहे. कोरोना महामारीमुळे शुक्रवारी ३७८ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ८०२ झाली. तर २९ हजार २४३ जण बरे झाले आहेत.
एक दिवस आधी, गुरुवारी कोरोनाचे १६ हजार ८१३ नवे रुग्ण आढळले होते. त्यामध्ये आंध्र प्रदेशातून परत आलेल्या दोन लोकांचा समावेश होता. यानंतर राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या २३ लाख ८ हजार ८३८ झाली तर ३५८ जणांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अॅम्ब्युलन्स दुर्घटनेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या गर्भवती महिलेच्या कुटुंबाला ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. महिलेला घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सचा कल्लाकुरीची जिल्ह्यात गुरुवारी रस्त्याकडेला झाडावर आपटून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या दोन नातेवाईकांना तीन-तीन लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. सोरापट्टू येथील गर्भवती महिला जयलक्ष्मी यांना अॅम्ब्युलन्समध्ये घेऊन पुडुपट्टू प्राथमिक आरोग्य केंद्रातून कल्लाकुरिची सरकारी हॉस्पिटलला नेण्यात येत होते.