पुणे : चीनी मंडी
कमी वाहतूक खर्चामुळे उत्तर प्रदेशच्या साखरेने अन्य राज्यांतील बाजारपेठांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याउलट महाराष्ट्राच्या साखरेला कमी मागणी दिसत आहे. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील साखरेच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांचा फरक असावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
केंद्र सरकारने देशभरात साखरेचा निर्धारीत दर २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचा फायदा उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांना होताना दिसत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील साखरेचा दर उत्तर प्रदेशच्या साखरेच्य दरापेक्षा १५० ते २०० रुपये प्रति क्विंटल कमी असायचा. त्यामुळे राजस्थान, गुजरात व इतर राज्यांमध्ये महाराष्ट्रातून साखर विकली जायची. पण, आता देशभरात साखरेच निर्धारीत विक्री दर एकच असल्यामुळे कमी वाहतुकीच्या खर्चाचा फायदा उत्तर प्रदेशमधील कारखान्यांना होत आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रवक्ते अॅड. योगेश पांडे यांनी दिली.
साखरेचे दर सर्वत्र समान असल्याने जेथून साखर खरेदी केल्यास कमी वाहतूक खर्च येईल, अशाच ठिकाणाहून साखर खरेदी केली जात आहे. महाराष्ट्रातही महानगरांच्या आसपास असणाऱ्या कारखान्यांमधून साखर खरेदी केली जात आहे. अन्य भागातील कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखरेचा दर हा उत्तर प्रदेशच्या साखरेपेक्षा प्रति क्लिंटल १५० रुपये कमी असावा, अशी मागणी अॅड. पांडे यांनी केली.