कोल्हापूर, ता. 9 : उसाची एक रक्कमी एफआरपी देण्यासाठी शासनाने प्रतिटन पाचशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल मुंबईत केली. यावेळी, गुरूवारपर्यंत (ता. 10) अनुदान देण्याबाबत किंवा साखरेचे दर वाढविण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र ही मागणी मान्य न झाल्यास शुक्रवारपासून (ता. 11) साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही कारखानदारांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ यांच्या शिष्ट मंडळाने चर्चा करून निवदेन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्याच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. अनुदान किंवा साखर दर वाढविण्याबाबत विनंती केली जाईल. दहा जानेवारीपर्यंत यावर ठोस निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन दिले. त्यानंतर साखर कारखानदारांचे हे शिष्टमंडळ महसूलमंत्री पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भेटून ही परिस्थिती सांगण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. सरकारच्या मदतीशिवाय एक रक्कमी एफआरपी देणे शक्य नाही. त्यामध्ये उसाची एकरक्कमी एफआरपी पाचशे रुपये कमी पडत आहेत. ही रक्कम शासनाने अनुदान म्हणून द्यावी किंवा केंद्राकडे पाचशे रुपये वाढवून घेवून साखरदर प्रतिक्विंटल 2900 रुपयांवरून 3400 रुपये करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व उपाध्यक्ष श्री शेट्टी यांच्या समवेत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे , आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके ,दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील , शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रपाटील- यड्रावकर, गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे आणि आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव चराटी हेही उपस्थित होते.