पुणे : चीनी मंडी
साखर ही आता जीवनावश्यक वस्तू राहिलेली नाही, असे मत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. साखर अजूनही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असल्यामुळे त्याला दर देण्यात अडचणी येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे साखरेला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याची मागणी त्यांनी एका जाहीर सभेत केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील युटेक साखर कारखान्यातील एका कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले होते.
मंत्री मुंडे म्हणाल्या, ‘बाजारपेठेत औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचा दर वेगळा आणि सामान्य ग्राहकांसाठी वेगळा करण्याची गरज आहे. त्यामुळे साखरेला चांगला दर मिळेल आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडतील. ’ ऊस तोडणी कामगारांचे काम खूपच कष्टाचे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी साखर कारखाना परिसरात आवश्यक सोयी सुविधा असण्याची गरज मंत्री मुंडे यांनी व्यक्त केली.