महराजगंज : गळीत हंगाम २०१७-१८प्रमाणे यंदाही उसाचे पैसे वेळेवर न दिल्याने गडौरा येथील जेएचव्ही शुगर मिलला कारवाईचा फटका बसला आहे. ऊस आयुक्तांनी पैसे देण्यास उशीर केल्याबद्दल गडौरा कारखाना प्रशासनावर वसूली प्रमाणपत्र (आरसी) कारवाई केली आहे.
जेएचव्ही शुगर मिलने यापूर्वीही शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. हा वाद वाढल्यानंतर शासनाने कायदेशीर कारवाई करताना कारखानाही दोन गळीत हंगामात बंद केला. प्रलंबित ऊस बिले देण्यासह यंदाची बिलेही गतीने दिली जातील अशा अटींवर कारखान्याच्या गळीत हंगामास परवानगी देण्यात आली होती. मात्र कारखान्याने आधीच्या थकीत बिलांपैकी १.३१ कोटी रुपये दिले नाहीत. चालू गळीत हंगामातील २६.१६ कोटी रुपयांची ऊस बिले थकली आहेत. ऊस विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर ऊस आयुक्तांनी कारखान्याविरोधात आरसीची कारवाई केली आहे. जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याने कारखान्यावर कारवाई केली आहे. कारखान्याने पैसे न दिल्याने आठ हजार शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कृषीप्रधान जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि दैनंदिन खर्चासाठीही पैसे नसल्याची स्थिती आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link