मुंबई : महाराष्ट्राला गेल्या चाळीस वर्षातील सर्वात मोठ्या पावसाचा आणि महापुराचा फटका बसला आहे. यावर्षी जून महिन्यापासून आतापर्यंत मान्सूनच्या फटक्यामुळे २२८ जणांचा मृत्यू झाला. यातील २८ जणांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाले आहेत. तर १४९ जणांचा मृत्यू गेल्या ७२ तासांत झाले आहेत.
ज्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले, त्यापैकी एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर विभागाच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसाने २१ जिल्ह्यांना फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी २७ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात भूस्खलन झाले आहे. याशिवाय आंबेघर, मिरगाव परिसरातही दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पुण्याहून हेलिकॉप्टरमधून कोयनानगर दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील तळीये गावात २२ जुलै रोजी भूस्खलन जाले होते. पाचव्या दिवशीही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफची पथके स्थानिकांच्या मदतीने कार्यरत आहेत. सोमवारपर्यंत ५३ जणांचे मृतदेह आढळले. आतापर्यंत ३२ जण ढिगाऱ्याखाली असतील अशी शक्यता आहे. वेळ निघून जात असल्याने त्यांची जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. पाऊस आणि दलदलीमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.
महाराष्ट्रात गेल्या ७२ तासात १४९ जणांचा मृत्यू झाला. यात ६० रायगड जिल्ह्यातील आहेत. याशिवाय साताऱ्यामध्ये ४१, मुंबई उपनगरात ४, सिंधुदुर्गमध्ये २, कोल्हापूरमध्ये ७, पुण्यात २, रत्नागिरी जिल्ह्यात २१ आणि ठाणे जिल्ह्यातील १२ जणांचा यात समावेश आहे. एनडीआरएफच्या २५ टीम, नेव्हीची ५, आर्मीची तीन तर कोस्टगार्डच्या २ टीम सध्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत. आतापर्यंत २.२९ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. २५ जुलैअखेर महाराष्ट्रात मान्सूनमध्ये ४६९.८ मिमी पावसाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ६२९.७ मिमी उच्चांकी पाऊस झाला आहे. विविध घटनांमध्ये जखमींवर तातडीने उपचाराचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link