नवी दिल्ली : चीनी मंडी
भारतात येत्या २०१९-२० या हंगामात साखर उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. देशातील सर्वांत मोठ्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळ सदृष्य स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे साखर उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम केवळ भारताच्या साखर निर्यातीवरच होणार नाही तर, जागतिक बाजारात २०१८मध्ये जवळपास १५ टक्क्यांनी घसरलेली साखरेची किंमत सावरण्यालाही याचा उपयोग होणार आहे.
विशेष म्हणजे २०१८च्या उत्तरार्धात भारतातील साखर उत्पादन उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. देशभरात वेळेवर आणि चांगला पाऊस झाल्याने हा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे शेतांमध्ये पिक जोमाने आले.
गेल्या हंगामाचा विचार केला तर, एप्रिल-मे २०१८मध्ये इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने ३१५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तत्पूर्वी, मार्च महिन्यात २९५ लाख टन उत्पादन अपेक्षित होते. भारताचे यापूर्वीचे विक्रमी उत्पादन २८३ लाख टन (२००६-०७) होते.
एवढेच नव्हे, तर विश्लेषकांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेल्या भारतातील उच्चांकी उत्पादनाचा जगातील बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. जागतिक बाजारात सप्टेंबर २०१५पासून साखरेचे दर घसरायला सुरुवात झाली होती. भारतातील उच्चांकी उत्पादनाच्या अंदाजामुळे गेल्या काही वर्षांत ३० टक्क्यांनी घसरलेले दर, आणखी खाली जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता मात्र, परिस्थिती बदलण्याचे संकेत दिसू लागले आहेत.
साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पाणी टंचाईचे संकट आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या ऊस उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे ऊस उत्पादक राज्य आहे. तर, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात १६.७ टक्क्यांनी म्हणजेच, ७.५ लाख टन उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे.
यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर, कर्नाटकमध्ये २९ टक्के कमी पाऊस झाला आहे. पाणी टंचाई बरोबर पांढऱ्या अळीचा प्रादुर्भावामुळेही यंदा उसाचे नुकसान झाले आहे.
दृष्टिक्षेपात परिस्थिती
– केंद्राच्या पाठिंब्यामुळे उत्तर प्रदेशात थकबाकी कमी करण्यात यश
– देशांतर्गत बाजारातील किमान विक्री दर २९ रुपयांवरून ३४-३५ रुपये किलो करण्याची मागणी प्रलंबित
– सध्याचा किमान विक्री दर साखर उद्योगासाठी फायदेशीर नाही
– याचा शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
– कारखान्यांकडे कॅश फ्लो कमी, शेतकऱ्यांची बिले थकली
भारतासाठी असेल संधी
देशांतर्गत बाजारातील साखरेचा किमान विक्री दर वाढवल्याने निर्यात थांबण्याची भीती व्यक्त होता आहे. मुळात जगातील साखरेचा साठ वाढण्यामागे भारतच जबाबदार असल्याची ओरड होत आहे. त्याचा परिणाम जागातील साखरेच्या दरांवर झाला आहे.
जर, भारत जगातील साखरेचा दर ठरवण्यास कारणीभूत ठरत असेल तर, जगभरात भारतातील साखर चांगल्या दरात खरेदी केली जाईल, असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. अर्थात ही भारतासाठी संधी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
डाउनलोड करे चिनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp