मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादन राज्य असलेल्या महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या आगामी साखर हंगामात ५.६ टक्के वाढीसह साखर उत्पादन ११२ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रीस्तरीय समितीच्या बैठकीत गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२१-२२ या हंगामात उसाचे लागण क्षेत्र वाढून १२.३२ लाख हेक्टर झाले आहे. तर उसाचे उत्पादन प्रती हेक्टरी ९७ टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पुढील हंगामात १९३ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. तर एकूण १०९६ लाख टन उसाचे गाळप होईल.
इकॉनॉमिक टाइम्स प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, राज्याच्या साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात २०२०-२१ या गळीत हंगामात १०१३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. आणि १०६.४ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात ११२ साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्लांट स्थापन केले असून त्यांच्याकडून २०६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जाते. मंत्री समितीने साखर उद्योगावर नियंत्रण ठेवणाऱ्या साखर आयुक्तालयाला काही निर्देश दिले आहेत. जे कारखाने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करणार नाहीत त्यांना गाळप परवाना दिला जाऊ नये असे बजावण्यात आले आहे. समितीने याबाबत निर्देश देताना सांगितले की, फक्त १४६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपीचे पैसे दिले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link