पुणे : चीनी मंडी
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे घसरलेल्या साखरेच्या दरांचा परिणाम एकूण साखर उद्योगावर होताना दिसत आहे. त्यामुळे २६० लाख टन साखरेची गरज असलेल्या भारतीय बाजारपेठेतील साखरेचा किमान विक्री दर वाढवावा, अशी मागणी साखर उद्योगातून होताना दिसत आहे. त्याला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असून, येत्या काही दिवसांत साखरेचे दर वाढणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. विक्री दरात वाढ झाल्यास दीर्घकाळ चिघळलेला एफआरपीचा प्रश्नही सुटण्याची आशा साखर उद्योगाला आहे.
सध्या भारतीय बाजारपेठेत साखर कारखान्यांना किमान विक्री तर २९०० रुपये प्रति क्विंटल असा देण्यात आला आहे. पण, साखरेचा उत्पादन खर्च ३४०० रुपये क्विंटलपर्यंत जात आहे. त्यामुळे किमान विक्री दर ३४०० रुपये करावा, अशी मागणी साखर कारखान्यांकडून होत होती.
साखरेचा किमान विक्री दर कमी असल्यामुळे कारखाने अडचणीत आले आहेत. एफआरपीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सरकारने याची दखल घेतल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र सरकारने किमान विक्री दर ३१०० रुपये करावा, अशी शिफारस केंद्राकडे केली होती. पण, केंद्राने विक्री दर ३२०० रुपये करण्याची तयारी केली आहे. या संदर्भात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर किरकोळ बाजारातील ग्राहकांसाठी साखर प्रति किलो तीन ते चार रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp