कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य आणि लाभदायी मूल्य (एफआरपी) तीन हप्त्यांमध्ये देण्याच्या प्रस्तावाविरोधात आपली जागर यात्रा सुरू केली आहे. शेट्टी यांनी या यात्रेची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिरातून केली. ते सर्व ऊस उत्पादक जिल्ह्यांमधील धार्मिक स्थळांना भेटी देणार आहेत. ही जागर यात्रा १५ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे समाप्त होणार आहे.
दी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकार महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपीचे गुजरात मॉडेल लागू करीत असल्याचा आरोप माजी खासदार शेट्टी यांनी केला आहे. हप्त्यांमध्ये ऊस बिले दिल्यास शेतकरी पीक कर्ज फेडू शकत नाहीत. शेचीसाठी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करणे कठीण होईल असे त्यांनी सांगितले. आम्ही एफआरपीचे तुकडे पाडू देणार नाही. आम्ही त्याविरोधात आहोत. केंद्र सरकारने हा हप्त्यांचा प्रस्ताव दिला आहे. त्याला महाराष्ट्र सरकारनेही सहमती दिली आहे असे शेट्टी म्हणाले. मी सर्व धार्मिक ठिकाणांना भेटी देत आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहे. यापूर्वी आम्ही मिस्ड कॉल अभियान सुरू केले. त्याला लाखो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. शेट्टी यांच्या या मागणीला त्यांच्या राजकीय विरोधकांकडूनही पाठिंबा मिळत आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोनवेळा खासदार असलेल्या शेट्टी यांना पराभूत करणाऱ्या हातकणंगलेच खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव मागे घेण्याचा आग्रह करणार आहेत. तीन हप्त्यात एफआरपीविरोधात केंद्र सरकारला पत्र लिहावे अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली जाईल.