हि बातमी तुम्ही आता ऐकू ही शकता
पुणे : चीनी मंडी
साखरेचे घसरलेले दर आणि रखडलेली निर्यात यांमुळे महाराष्ट्रात साखरेचा साठा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. डिसेंबरअखेर राज्यात ७२.५७ लाख टन साखर शिल्लक आहे. राज्यात वेगाने सुरू असलेले ऊस गाळप पाहता या साठ्यात येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.
महाराष्ट्रात थकीत एफआरपीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरले आहेत. कारखान्यांची साखर बँकांकडे तारण असल्याने बँका कमी दराने साखर निर्यात करण्यास तयार नाहीत. त्यामुळे साखरेला उठावच नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारखान्यांच्या गोदामांमध्ये साखर साठा वाढू लागला आहे.
राज्यात यंदाचा २०१८-१९ गाळप हंगाम वेळेत सुरू झाला. काही ठिकाणी हंगाम थोडा रखडला असला तरी, हंगामाच्या सुरुवातीलाच १ ऑक्टोबर रोजी राज्यात ५३.३६ लाख टन साखर शिल्लक होती. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांत महाराष्ट्रात एकूण ४४.०४ लाख टन साखर उत्पादन तयार झाले. त्यामुळे राज्यात डिसेंबर अखेर ९७.४० लाख टन साखर झाली होती. देशात साखरेची मागणी अतिशय कमी आहे. त्यामुळे कारखान्यांत साखर पडून आहे. केंद्राकडून जाहीर करण्यात येणाऱ्या मासिक साखर विक्रीचा कोटाही पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात २४.८३ लाख टन साखरेचीच विक्री पूर्ण होऊ शकली. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात तब्बल ७२.५७ लाख टन शिल्लक राहिली आहे.
जानेवारीत २० लाख टन उत्पादन
साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालानुसार राज्यात सुमारे ६०० लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यातून सुमारे ६४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. जानेवारी महिन्यात गेल्या २५ दिवसांत सुमारे २० लाख टन साखरेची भर पडली आहे. त्यामुळे डिसेंबरचा साठा नव्वद लाख टनांच्या घरात गेल्याची शक्यता आहे. पण, अद्याप या दिवसांतील विक्रीचा आकडेवारी समोर आलेली नाही. त्यामुळे शिल्लक साठ्याची नेमकी स्थिती सांगता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp