लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने पाऊस आणि पुराचा फटका बसलेल्या सुमारे २ लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना पावसामुळे भात, ऊसासारख्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे २ लाख शेतकऱ्यांच्या पिकाचे राज्यात सर्वाधिक पाऊस आणि पुरामुळे नुकसान झाले आहे. महसूल तथा कृषी विभागाच्या सर्व्हेनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे त्यांनी सांगितले.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, राज्य सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांना निकषानुसार लवकरात लवकर भरपाई मिळेल. महसूल आणि कृषी विभागाच्या समन्वयातून यासाठी प्राथमिक कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकार पुराचा फटका बसलेल्या सर्व क्षेत्राला आवश्यक मदत, पुनर्वसनाच्या उपाय योजना करीत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पिक खराब झाले आहे, त्यांना ६८ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.