पुणे : साखर कारखानदार आणि रिफायनरींनी इथेनॉलसारख्या वैकल्पिक इंधनावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यामुळे साखरेचे अतिरिक्त उत्पादन, ऊस आणि साखरेच्या दरासारखे मुद्दे निकाली निघतील असे ते म्हणाले. साखर उद्योगाचे भविष्य आता इथेनॉल उत्पादनाशी निगडीत आहे अशी भूमिका गडकरी यांनी यावेळी मांडली. पुण्यातील यशदा अकादमीत डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) ६६ व्या वार्षिक संमेलनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्र सरकार वाहनांना फ्लेक्स इंजिन अनिवार्य बनविण्याच्या प्रस्तावावर काम करीत असल्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले. त्यानंतर वाहने पेट्रोल अथवा इथेनॉलचे मिश्रण अथवा फक्त पेट्रोल किंवा इथेनॉल अशा पर्यायांवर धावू शकतील. साखर आणि ऊसापासून जास्तीत जास्त इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारताला इंधन आयातीवर खूप पैसे खर्च करावे लागत आहेत. आणि इथेनॉल उत्पादनात वाढ होण्याची गरज आहे असे गडकरी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना उसाचे चांगले पैसेही मिळतील आणि साखर उद्योग हा भविष्यात इथेनॉल उत्पादनाशी जोडला जाईल असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला