अमरावती : महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली आहे. एकीकडे यंदा राज्यात चांगल्या साखर उत्पादनाचे संकेत आहेत. दुसरीकडे अमरावती विभागात गळीत हंगामाची संथगती दिसून आली आहे. सद्यस्थितीत ४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अमरावती विभागात एकाच साखर कारखान्याने गाळप केले आहे.
राज्यात ३५ सहकारी तथा ४० खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. ३१.७३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत २४.६९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २०२०-२१ या हंगामातील उसाचे क्षेत्र ११.४८ लाख हेक्टरवरुन ११ टक्क्यांनी वाढून २०२१-२२ मध्ये १२.७८ लाख हेक्टर झाले आहे. राज्यात मान्सूनचा पाऊस चांगला झाला. यासोबतच राज्यातील सर्वच विभागात धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. ऊस इथेनॉलकडे वळवला नाही तर महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन १२२.५ लाख टन होण्याची अपेक्षा आहे.