नवी दिल्ली : पुढील काही दिवसांत मोटार निर्मात्या कंपन्यांना वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युएल इंजिन बनविण्यासाठी निर्देश दिले जातील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी डॉ. मंगलम स्वामीनाथन फाउंडेशनच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २०२१ मध्ये बोलत होते. पुढील २-३ दिवसांत यासंबंधीच्या फाइलवर मी स्वाक्षरी करणार आहे. त्यातून कार निर्मात्यांना १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणारी इंजिन तयार करण्यास सांगण्यात येणार आहे, असे गडकरी म्हणाले.
मंत्री गडकरी म्हणाले, देशात सध्या ८ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम उत्पादने आयात केली जातात. जर अशाच पद्धतीने खप वाढत राहीला तर पुढील पाच वर्षात ही आयात वाढून २५ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल. टोयाटो मोटर कॉर्पोरेशन, सुझुकी आणि हुंडई मोटर इंडियाच्या कार्यकारी संचालकांनी मला ब्राझील, अमेरिका आणि कॅनडासारख्या १०० टक्के बायो इथेनॉलवर चालणारी इंजिन तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. ही वाहने १०० टक्के पेट्रोलऐवजी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या इंधनावर चालतील.