नवी दिल्ली : देशात २०२१-२२चा गळीत हंगाम आता पूर्ण क्षमतेने सुरू आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार यंदा ३० नोव्हेंबरअखेर देशात ४१६ साखर कारखाने सरू आहेत. त्यांनी सुमारे ४७.२१ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर ३० नोव्हेंबर २०२० मध्ये ४०९ कारखान्यांनी ४३.०२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. या वर्षी गेल्या हंगामाच्या या कालावधीच्या तुलनेत ४.१९ लाख टनाने उत्पादन अधिक आहे. देशाच्या पश्चिम क्षेत्रात आधीच गळीत हंगाम सुरू झाल्याने उत्पादनात ही वाढ दिसून आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ३० नोव्हेंबरअखेर १०१ साखर कारखाने गाळप करीत आहेत. आतापर्यंत १०.३९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२० अखेर उत्तर प्रदेशात १११ साखर कारखाने गाळप करत होते. त्यांनी १२.६५ लाख टन साखर उत्पादन केले होते.
महाराष्ट्रात १७२ साखर कारखान्यांनी यंदा ३० नोव्हेंबरअखेर गाळप सुरू केले आहे. तर गेल्यावर्षी या तारखेअखेर १५८ कारखाने सुरू झाले होते. ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यातील साखर उत्पादन २०.३४ लाख टन झाले आहे. तर गेल्यावर्षी या कालावधीत १५.७९ लाख टन उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात उसाची अधिक उपलब्धता आणि आधीच सुरू झालेला गळीत हंगाम या दोन कारणांनी साखर उत्पादन अधिक झाले आहे.
कर्नाटकात ३० नोव्हेंबरअखेर ६६ कारखाने गाळप करीत आहेत. त्यांनी १२.७६ लाख टन साखर उत्पादन केले आहे. या तुलनेत गेल्यावर्षी २० नोव्हेंबर २०२० अखेर ६३ कारखाने सुरू होते. त्यांनी ११.११ लाख टन साखर उत्पादन केले होते. गुजरातमध्ये सध्या १५ कारखाने सुरू असून त्यांनी १.६६ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षीही १५ कारखानेच गाळप करत होते. त्यांनी १.६५ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.
उर्वरीत सर्व राज्यांत गळीत हंगाम सुरू झाला आहे. इतर राज्यांत ६२ कारखाने सुरू आहेत. त्यांनी ३० नोव्हेंबरअखेर २.०६ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्या हंगामात एवढ्याच साखर कारखान्यांनी उसाचे गाळप करून १.८२ लाख टन साखर उत्पादन केले होते.
कारखान्यांकडून दिलेल्या माहितीनुसार आणि इस्माच्या अनुमानानुसार, चालू हंगामाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०२१ मध्ये सरकारने मंजूर केलेल्या २४ लाख टन देशांतर्गत साखर विक्रीच्या कोट्याच्या तुलनेत एकूण २४.५० लाख टन विक्री झाली आहे. सरकारने २.५ लाख टन अतिरिक्त कोटा विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. तरीही इतकी साखर विक्री झाली हे उल्लेखनीय आहे.
बाजारातील अहवाल आणि बड्या व्यापारी समुहांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात ३५ लाख टन साखर निर्यातीचे करार आधीच करण्यात आले आहेत. ज्यावेळी जागतिक बाजारपेठेत साखरेचा दर प्रती पाऊंड २०-२१ सेंट होता, तेव्हा यातील बहुतांश करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत साखरेच्या किमती १८.६ सेंटर प्रती पाऊंडजवळ आहेत. त्यामुळे भारतीय साखर कारखाने निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात पुढाकार घेत नसल्याची स्थिती आहे.
OMCsने इथेनॉल पुरवठा वर्ष डिसेंबर २०२१-नोव्हेंबर २०२२ या काळात ऑक्टोबर २०२१ च्या अखेरीस ४५९ कोटी लिटरच्या निविदा काढल्या आहेत. १२ नोव्हेंबर २०२१ मध्ये निविदा उघडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये इथेनॉल उत्पादकांनी इथेनॉल पुरवठ्यासाठी ४१४ कोटी लिटरच्या निविदा सादर करण्यात आल्या होत्या.