कोल्हापूर : जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे ऊस तोडणीवरही परिणाम झाला आहे. ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे दुसरीकडे बुधवारी जिल्ह्यातील प्राथमिक शाळाही सुरू झाल्या. मात्र, पावसामुळे दुसऱ्या दिवशीच मुलांच्या उपस्थितीत मोठी घसरण झाली. कॉलेजांमध्ये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्येही अशीच स्थिती होती. ऑफलाइन क्लासमध्ये फक्त १० टक्के उपस्थिती पाहायला मिळाली.
जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी घुसले आहे. परीख पूल, सीपीआर चौक, राजारामपुरीतील पहिली गल्ली भागात पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत झआली. पावसामुळे वडणगे गावातील ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले. परिणामी त्यांचे स्थलांतर करावे लागले. झोपडी आणि संसारिक साहित्याचे नुकसान झाले. पावसामुळे आसपासच्या झोपड्यांचे नुकसान झाले. त्यांना शेजारील एका शाळेत हलविण्यात आले असून जेवण आणि कपड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.