ढाका : कोविडच्या फटक्याने बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने बांगलादेश व्यापार महामंडळाने सवलतीच्या दरात नव्याने राष्ट्रीय कमोडिटी विक्री योजनेला सुरुवात केली आहे. Trading Corporation of Bangladesh (टीसीबी) ने याबाबत प्रसिद्धी पत्रकातून घोषणा केली आहे. ढाकासह इतर महानगरांतील शहरे, जिल्हे आणि उप जिल्ह्यांच्या ठिकाणी सवलतीच्या दरात साखर, लाल मसूर, सोयाबीन तेल, कांद्यासह इतर चार वस्तूंची विक्री केली जाईल. ओएमएस कार्यक्रमांतर्गत ४००-५०० मोबाईल ट्रकमधून २८ डिसेंबरपर्यंत टीसीबीकडून उत्पादनांची विक्री केली जाणार आहे.
टीसीबीकडून साखरेची Tk ५५ किलो, डाळ Tk ६० किलो, सोयाबीन तेल Tk ११० लीटर आणि कांदा Tk ३० किलो या दराने विक्री होईल. टीसीबीने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक ट्रकमधून दररोज २००-५०० किलो साखर, ३००-६०० किलो लाल मसूर, ४००-६०० लिटर सोयाबीन तेल, ५००-१००० किलो कांद्याची विक्री होईल. साखर, लाल मसूर, सोयाबीन तेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात गेल्या वर्षभरापासून वाढ होत आहे. परिणामी लोकांना आर्थिक फटका बसत आहे. बाजारात साखर Tk ७५-८० प्रती किलो, तर सोयाबीन तेल Tk१५५-१६५ प्रति लिटर दराने मिळत आहे. तर लाल मसुर Tk९०-१०० प्रती किलो आणि कांदा Tk ४०-५५ प्रती किलो दराने विक्री होत आहे.