बेंगळुरू : उत्तर कर्नाटकातील साखर उद्योगाशी संलग्न MLCs ने इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी एका स्वतंत्र धोरणाची मागणी केली आहे. याशिवाय, ऊस पिकाचा समावेश पंतप्रधान पिक विमा योजनेत (पीएमएफबीवाय) करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. याबाबत साखर उद्योग मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी विधान परिषदेत सांगितले की, ते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी इथेनॉल पॉलिसी तयार करण्याबाबत चर्चा करतील. ऊस पिकाला पंतप्रधान विमा योजनेच्या कक्षेत आणण्याबाबत कृषी मंत्री बी. सी. पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल.
ऊस उत्पादकांना उशीरा मिळणारे पैसे आणि ऊसाचा दर शास्त्रिय पद्धतीने ठरवले जावे या दोन्ही बाबी महत्वाच्या असल्याचे आमदार महंतेश कवटगीमठ यांनी सांगितले. या चर्चेच्या दरम्यान इतर मुद्दे उपस्थित करण्यात आले. कवटगीमठ यांनी सांगितले की, केंद्र सरकार साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन देण्यासाठी व्याज अनुदान देत आहे. राज्यानेही यासाठी पाठबळ देण्याची गरज आहे. माजी उपमुख्यमंत्री, लक्ष्मण सवदी यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांनी इथेनॉलसाठी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. कर्नाटकलाही अशा प्रकारच्या स्वतंत्र धोरणाची गरज आहे.