बडौत : ऊस विभागाने गेल्या आठवड्यात २४० कोटी रुपयांची ऊस बिले न दिल्यामुळे तसेच विक्री केलेल्या साखरेचे ३.५ कोटी रुपये इतरत्र वळवल्यामुळे गोदाम सील करण्याची कारवाई केली होती. आता ऊस विभागाने साखर विक्री करण्यावरील बंदी हटवली आहे.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी ताब्यात घेण्यात आलेली साखर मुक्त करण्यात आल्याच्या माहितीस दुजोरा दिला. दुसरीकडे मलकपूर साखर कारखान्याच्या ऊस विभागाचे महाव्यवस्थापक मुकेश मलिक यांनी सांगितले की, आतापर्यंत मलकपूर साखर कारखान्याने २८.८५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले असून ३.०१ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. बागपत सहकारी साखर कारखान्याने ९.३१ लाख क्विंटल ऊस गाळप करून ९१ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तर रमाला सहकारी साखर कारखान्याने १९.८५ लाख क्विंटल उसाचे गाळप करुन १.८५ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्यांकडे ऊस बिलांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने ऊस विभागाने दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.