बेंगळुरू : विश्वराज शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या पेटेंट तंत्रज्ञानाचा वापर करून फार्मास्युटिकल ग्रेडच्या साखरेचे उत्पादन केले जाणार असल्याची माहिती भारतीय शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीकडे नव्या तंत्रज्ञानाने युक्त अत्याधुनिक विकास केंद्र आहे. कंपनी भारतात अग्रेसर फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक फार्मा कंपनी आहे. फार्मा ग्रेडच्या साखरेचा पुरवठा करण्याची प्रक्रिया करण्यात कंपनी अग्रेसर असून संपूर्ण जगात कंपनी याची निर्यात करणार आहे.
कंपनीने IS 1151, 2021 प्रक्रियेची पूर्तता करणाऱ्या प्रक्रियायुक्त ग्रेडच्या साखरेचे उत्पादनही सुरू केले आहे.
इथेनॉल मिश्रीत पेट्रोलच्या (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील जीएसटीचा दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा साखर कंपन्यांना चांगला फायदा होणार आहे. विश्वराज शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडलाही याचा फायदा होईल. यामुळे कंपनीच्या महसुलात खूप वाढ होणार आहे.
यापूर्वी विश्वराज शुगर इंडस्ट्रीजने (व्हीएसआयएल) १५५ कोटी रुपये मुल्याची २.५० कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी तेल वितरण कंपन्यांना (ओएमसी) अर्थात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) यांच्याशी करार केला आहे. हे करार डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहेत. व्हीएसआयएलचे कार्यकारी संचालक मुकेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही २.२५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला होता. यंदा डिसेंबर २०२१ मध्ये आम्ही २.५० कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी तेल वितरण कंपन्यांसोबत (ओएमसी) बीपीसीएल, आयओसी, एचपीसीएलसोबत करार केले आहेत.