कराची : बांगलादेशची निर्यात जवळपास ४० अब्ज डॉलरपर्यंत (७.१२ ट्रिलियन) पोहोचला आहे. मात्र, पाकिस्तानची निर्यात २५ अब्ज डॉलरवर (जवळपास ४.४५ ट्रिलियन) थांबला आहे. कारण, आपली धोरणे व्यवसायास अनुकूल नाहीत, असे सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सैयद मुराद अली शाह यांनी सांगितले. सैयद मुराद अली शाह यांनी वाणिज्य आणि उद्योगातील (एफपीसीसीआय) सदस्यांसह एका कार्यक्रमात त्यांनी इतर व्यावसायिकांशीही संवाद साधला.
ते म्हणाले, मी उद्योगपतींसोबत एक कार्यकारी समूह तयार करीत आहे. त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी या अंतर्गत प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी एस. एम. मुनेर, डॉ. इख्तियार बाईंग, जुबेर तुफेल, खालिद तवाब, डॉ. नोमन इड्रिस बट, हनीफ गोहर, इश्तियाक बग आणि जाहिद इक्बाल चौधरी यांच्यासह जवळपास १८० आघाडीच्या उद्योजकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री सैयद मुराद अली शाह म्हणाले, पाकिस्तानकडून युरियाची निर्यात केली जात होती. मात्र, आज देशाला याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या रब्बी हंगामातील पिकावर परिणाम होत आहे. मला आश्चर्य वाटते की, आम्ही गहू, गॅस, साखरेच्या तुटवड्याशी सामना करीत आहोत. या वस्तूंची आपण निर्यात करीत होतो. ते म्हणाले, आमची सदोष धोरणे यासाठी कारणीभूत आहेत हे यातून स्पष्ट होते.
दरम्यान, उद्योगपती एस. एम. मुनेर यांनी आपल्या व्यावसायिक अनुकूल धोरणे, दृष्टिकोनाबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.