बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली : चीनी मंडी
साखर उत्पादनातून नफा मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या साखर कारखान्यांनासाठी इथेनॉल एक आधार बनला आहे. देशातील तीन मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांच्या व्यवसायात ७ ते १४ टक्के वाटा असलेल्या इथेनॉल उद्योगाने यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत ५१ ते ५६ टक्के ढोबळ नफा (व्याज आणि कर वजा करण्याआधीचा नफा) मिळवून दिल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्याचवेळी या काळात साखर उद्योगातून केवळ २१ ते ३३ टक्के ढोबळ नफा मिळवता आला आहे.
जादा इथेनॉल तयार केल्यामुळे साखर कारखान्यांचे कालचक्र बदलले असून, कारखाने नफा मिळवू लागले आहेत. सरकारने गेल्या वर्षी थेट उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ करून साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे तोट्यात चाललेल्या कारखान्यांना दिलासा दिला होता. सरकारने ४ हजार ४०० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज वाटप केले होते. त्यातून साखर कारखान्यांना नवे इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी, दुरुस्ती तसेच इथेनॉल प्रकल्पांच्या विस्तारासाठी निधी उपलब्ध झाला. तसेच थेट ऊस रसापासून इथेनॉल तयार करण्यास अनुमती मिळाल्याने कारखान्यांना पैसे मिळण्याची संधी निर्माण झाली. इथेनॉलची खरेदी किंमत ही प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला सरकारकडून जाहीर केली जाते.
या संदर्भात बलरामपूर साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सारौगी म्हणाले, ‘साखर उद्योगापुढे इतकी आव्हाने असतानाही बलरामपूर साखर कारखान्याने अतिशय स्थीर आणि चांगले रिझर्ल्टस दिले आहेत. साखर विभागामधून फारशी आशा नसल्याने तो विभाग बाजूला ठेवण्यात आला. तुलनेत डिस्टलरी विभागातून होणारा नफा व्यवस्थापनाचा उत्साह वाढवणार होता.’ उत्तर प्रदेशातील गुलैरिया येथील डिस्टलरी प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचा कंपनीने निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
धमपूर शुगरने गुंवतवणूकदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिस्टलरी विभागाची कामगिरी लक्षणीयरित्या सुधारली आहे. कंपनी या विभागावर लक्ष केंद्रीत करत आहे. कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीमध्ये बी ग्रेड मळीपासून बनवलेले ४७ लाख लिटर इथेनॉल विक्री केले आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्याने उसळी घेतली असून, नफा ८२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इथेनॉलच्या माध्यमातून मिळणारा महसूल ४२ टक्क्यांनी वाढला आहे. बलरामपूर साखर कारखान्याचा नफा डिसेंबरच्या तिमाहीमध्ये दुप्पट झाला असून, १२ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. डिस्टलरी नफ्यामध्ये ३९ टक्क्यांची वाढ दिसत असून, साखर उद्योगातून मिळणारा महसूल १२ टक्क्यांनी घसरला आहे. देशातील तेल वितरण कंपन्यांना आतापर्यंत २६ कोटी लिटर इथेनॉल पुरवण्यात आले आहे. इथेनॉल मिश्रण धोरणानुसार आता सरकार कंपन्यांना १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल पुरवण्याच्या सूचना देण्याची शक्यता आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp