ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सजग असलेल्या राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय आर. भुसरेड्डी यांनी साखर कारखान्याच्या गेटवर येणाऱ्या शेतकऱ्यांना थंडी तसेच शीतलहर आणि कोविड १९ च्या संक्रमणापासून बचावासाठी सॅनिटायझर, हँडवॉश, पाणी, शेकोटी अशा मुलभूत सुविधा पुरवाव्यात असे निर्देश दिले आहेत.
याबाबत आदेशात ऊस आयुक्तांनी म्हटले आहे की, साखर कारखान्यांच्या गेटवर तसेच यार्डमध्ये शेकोटी, गरम पाण्याची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडावे लागणार नाही. तसेच शेतकऱ्यांना थंडीपासून दिलासा मिळेल. तसेच हात धुण्यासाठी पाणी, साबण, योग्य ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था केल्यास कोविड १९ चे संक्रमण रोखता येईल.
याशिवाय राज्यातील बहुतांश ठिकाणी दाट धुके पसरत आहे. त्यामुळे दुर्घटनांची शक्यता आहे. अशावेळी साखर कारखान्याच्या गेटवर तसेच ऊस खरेदी केंद्रांच्या ठिकाणी ऊस भरणीवेळी आलेल्या सर्व वाहनांवर रिफ्लेक्टर पट्टी लावावी.
विभागीय अधिकाऱ्यांनीही ऊस वजनावेळी वाहनांमध्ये रिफ्लेक्टर लावण्याबाबत अभियान राबवण्यात यावे. हंगामात दोन ते तीन वेळा अशा प्रकारे वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबवून रस्त्यांच्या सुरक्षेबाबतची काळजी घ्यावी. सर्व साखर कारखान्यांनी आपापल्या क्षेत्रात याबाबत कार्यवाही करावी.
विभागीय अधिकाऱ्यांना ऊस आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या कारखाना कार्यस्थळ, केन यार्डमधील भेटीप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून फिडबॅक घेण्याच्या सुचनाही केल्या आहेत. शेतकऱ्यांना ज्या व्यावहारिक समस्या येतात, त्यांची सोडवणूक करणे शक्य होईल असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.