ऑक्टोबर-डिसेंबर २०२१मध्ये साखर निर्यातीत चौपट वाढ, निर्यात १७ लाख टनांवर : इस्मा

नवी दिल्ली : ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत देशातील साखर निर्यात जवळपास चौपट वाढून १७ लाख टनांवर पोहोचली आहे अशी माहिती साखर उद्योगाची शिखर संस्था इस्माने दिली. परदेशातील मागणी वाढल्याने ही निर्यात वाढली आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी ३८-४० लाख टन निर्यातीचे करार केले आहेत. कारखाने आता निर्यात करण्यासाठी जागतिक बाजारपेठेत दरात वाढ होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

साखर उद्योगात ऑक्टोबर ते सप्टेंबर असे वर्ष असते. इस्माने आपल्या निवेदनात म्हटले आहे की बाजारातील अहवाल आणि बंदरांतील माहितीनुसार ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ या कालावधीत जवळपास १७ लाख टन साखरेची निर्यात केली गेली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ४.५ लाख टन साखर निर्यात केली गेली होती. या महिन्यात जवळपास सात लाख टन साखर निर्यात होण्याच्या प्रक्रियेत असल्याचे इस्माने सांगितले.

इस्माने सांगितले की, ब्राझीलमध्ये आगामी २०२२-२३ या हंगामात चांगले उत्पादन होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या साखरेच्या जागतिक दरात घसरण झाली आहे. सध्या गेल्या पाच महिन्याच्या निच्चांकी स्तरावर, १८ सेंट प्रती पाऊंड असा दर आहे. असोसिएशनने सांगितले की भारतीय कारखाने योग्य वेळेची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांना करार करण्याची घाई नाही. आतापर्यंत ३८-४० लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत.

भारतीय साखर कारखाने संघाने (इस्मा) सांगितले की, देशात चालू हंगामात २०२१-२२ मध्ये एक ऑक्टोबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत १५१.४१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षात समान कालावधीत १४२.७८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

इस्माने सांगितले की महाराष्ट्रातील कारखान्यांनी १५ जानेवारी अखेर ५८.८४ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत ५१.५५ लाख टन उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशात १५ जानेवारीपर्यंत उत्पादन घटून ४०.१७ लाख टनावर आले आहे. एक वर्षापूर्वी ते ४२.९९ लाख टन होते. कर्नाटकमध्ये १५ जानेवारीपर्यंत उत्पादन वाढून ३३.२० लाख टन झाले आहे. आधीच्या वर्षी ते २९.८० लाख टन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here