नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन आणि साखर निर्यात वाढल्याने देशातील साखर उद्योगात आर्थिक तरलतेची समस्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे या हंगामात अनेक साखर कारखान्यांनी गळीतासाठी आलेल्या ऊसापोटी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशच्या (ISMA) माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत भारतातील साखर निर्यात वाढून १७ लाख टनावर पोहोचली आहे. आतापर्यंत कारखान्यांनी निर्यातीचे ३८-४० लाख टनाचे करार केले आहेत. आता कारखाने निर्यात करारासाठी साखरेच्या जागतिक किमतीमध्ये सुधारणांची प्रतीक्षा करीत आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत जवळपास १७ लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास ४.५ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. याशिवाय, या महिन्यात जवळपास ७ लाख टन साखर निर्यात होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे.
इस्माने सांगितले की, देशात १ ऑक्टोबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत १५१.४१ लाख टन साखरेच उत्पादन करण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात याच कालावधीत १४२.७८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.