मोतिहारी : बगहा येथून झारखंडला जाणाऱ्या ट्रकसह साखर पोती गायब केल्याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकारात सहभागी असलेल्या वाहतूकदारासह दहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये वाहतूकदार संतोष कुमार सिंह हा मोतिहारी शहरातील रहिवासी आहे. उर्वरीत संशयितांपैकी डुमरियाघाट विभागातील रामपुर खजुरीयातील सुरेश शाह, दीपक गोस्मावी, डुमरीयातील संतोष पाठक, राजू पाठक, कन्हैया पाठक, कुमोद पाठक, रोशन पाठक, निजामुद्दीन येथील विजय महतो आदी लोकांचा समावेश आहे.
मंगळवारी पोलिसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार रामपुर खजुरीया, पकडी, डुमरिया, रमपुरवा यांसह संग्रामपूर येथील दुकानदारांवर छापे टाकले. स्वस्त दरात दुकानदारांना साखरेची पोती विक्री केली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. दहा दुकानदारांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना रमपुरवा येथील मनोज गोस्वामी यांच्या दुकानात ७० पोती साखर मिळाली. तर संग्रामपुरमधील विजय महातो याच्या गोडावूनमध्ये १७० पोती साखर होती. साखर विक्रीतील ६० हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले. झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यातील पालोजोरी गावातील माँ भगवती एंटरप्राइजचे मुनीलाल साह यांनी कोलकाता येथील एजंट अमित कुमार यांच्याकडून पंचारण्यमधील तिरुपती शुगर मिलकडून ११ लाक ३२ हजार रुपयांना ६०० पोती साखर १५ जानेवारी रोजी खरेदी केली होती. मोतीहारी येथील वाहतूकदार संतोष कुमार सिंह याला हे काम दिले होते. १५ जानेवारी रोजी तो माल घेऊन निघाला. मात्र, १७ जानेवारी रोजी चालकाने मोबाईल स्वीच ऑफ करुन ट्रकसह पोबारा केला. संशयितांनी ही साखर परिसरातील दुकानदारांना कमी दरात विक्री केली होती.