मुजफ्फरनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर ऊसाची बिले उशीरा दिली गेली, तर शेतकऱ्यांना व्याजासह पैसे दिले जातील. हे पैसे कारखान्याच्या मालकांकडून वसूल केले जातील असे आश्वासन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिले. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात या घोषणेचा समावेश असेल असे शहा म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ऊस उत्पादकांचा मुद्दा पुन्हा तापला आहे.
याबाबत नवभारत टाइम्स डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुजफ्फरनगरात लोकांशी संवाद साधताना अमित शहा म्हणाले, आम्ही भाजपच्या घोषणापत्रातही याचा समावेश करू की, ऊस बिले देण्यास उशीर झाला तर कारखान्यांकडून व्याज वसुल केले जाईल. शेतकऱ्यांना व्याजासह पैसे दिले जातील. खरेतर ऊस उत्पादकांच्या थकबाकीवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला आता भाजप उत्तर देत आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी आधीच्या सरकारच्या काळात बंद पडलेल्या कारखान्यांचाही मुद्दा उपस्थित केला. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकाळात २१ कारखाने बंद पडले होते. आमच्या कार्यकाळात एकही कारखाना बंद झाला नाही. ऊस उत्पादनात उत्तर प्रदेश देशात अव्वल आहे असे ते म्हणाले. दरम्यान, समाजवादी पक्षाने आधीच ऊस बिले देण्यासाठी स्वतंत्र निधी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.