गोहाना : राज्यातील पाच जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकरी पाच फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमधील खासगी साखर कारखान्याला घेराव घालणार आहेत, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यवान नरवाल यांनी दिली. आंदोलन दीर्घकाळ सुरू राहणार असल्याने शेतकरी तेथे राहण्याच्या तयारीनेच येणार आहेत. हे आंदोलन बेमुदत असेल. कारखान्याने पाच वर्षांपूर्वीचे ३४.२५ कोटी रुपयांची थकबाकी द्यावी अशी मागणी आहे. नरवाल यांनी गोहाना येथील रोहटक रोडवरील एका खासगी कार्यालयातील पत्रकार परिषतेही आंदोलनाची माहिती दिली.
सत्यवान नरवाल यांनी सांगितले की, वर्ष २०१७ मध्ये हरियाणात उसाचा दर ३३० रुपये प्रती क्विंटल होता. त्या वर्षी भरपूर ऊस उत्पादन झाले. राज्यातील कारखान्यांनी ऊस न घेतल्याने शेतकऱ्यांना उत्तराखंडमधील रुडकी येथील धनश्री साखर कारखान्याला ऊस पाठवावा लागला होता. हा ऊस प्रती क्विंटल ३३०, २६०, २५० रुपये अशा मनमानी दराने घेतला. त्यानंतर पाच वर्षात शेतकऱ्यांना किरकोळ रक्कम दिली आहे. अद्याप ३४.२५ कोटी रुपये थकबाकी आहे. सोनीपत, पानीपत, रोहटक, कर्नाल आणि जिंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे पैसे आहेत. हा प्रश्न मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे मांडला होता. त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. भाकियू अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने डेहराडूनमध्ये उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, काहीच झालेले नाही. त्यामुळे शेतकरी बेमुदत आंदोलन करीत आहेत, असे नरवाल म्हणाले.