गाजियाबाद : बहुजन समाज पार्टीच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी थकीत ऊस बिलांच्या मुद्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. मायावती यांनी गाजियाबादमध्ये जाहीर सभेत बोलताना सांगितले की, समाजवादी पक्ष (सपा) आणि भाजपने कायद्याचा खेळखंडोबा केला आहे. आमची सत्ता आल्यास बेकायदेशीर गोष्टींना थारा दिला जाणार नाही. आमच्या पक्षाने सत्ताकाळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ दिले होते. वेळेवर त्यांना ऊस बिले देण्यात आली होती. पुन्हा राज्यात बसप सत्तेवर आल्यास असेच चित्र दिसेल असे आश्वासन त्यांनी दिले.
मायावतींनी बसपामध्ये भेदभाव, विभाजनवादी आणि पक्षपातीपणास कोणताही थारा नसल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, बसपाने नेहमी कोणत्याही भेदभावाशिवाय विकासावर भर दिला आहे. सपा आणि भाजपवर टीका करताना मायावती म्हणाल्या, समाजवादी पक्ष आणि भाजप सत्तेवर आला. मात्र, या दोन्ही पक्षांनी आतापर्यंत कोनशीला ठेवल्या. कोणतेही काम करण्यात हे पक्ष अपयशी ठरले.
उत्तर प्रदेशमध्ये ८४ लोकसभा आणि ४०३ विधानसभा मतदारसंघ आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी, दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारी, तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी आणि चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारी रोजी होईल. पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील मतदान २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी होईल. सातव्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होईल.