हरियाणा : पावसामुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी राज्य सरकार देणार भरपाई

चंदीगड : जोरदार पाऊस, पूर आणि किडींच्या हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५६१.११ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असल्याची माहिती हरियाणा सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली. राज्यात जोरदार पाऊस, पाणी साठणे तसेच किटकांच्या हल्ल्यांमुळे कापूस, मुग, भात, बाजरी, ऊस आदी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त, उपायुक्तांना आदेश देण्यात आले होते, असे प्रवक्त्यांनी सांगितले. सर्व उपायुक्तांनी आयुक्तांच्या माध्यमातून सरकारकडे पिक नुकसानीचा तपशील देणारा अहवाल सादर केला आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर सरकारने भरपाईच्या रुपात ५६१.११ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे.

याबाबत इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार हिस्सार क्षेत्रासाठी १७२.३२ कोटी रुपये, भिवानीसाठी १२७.०२ कोटी रुपये, फतेहाबादसाठी ९५.२९ कोटी रुपये, सिरसासाठी ७२.८६ कोटी रुपये, चरखी दादरीसाठी ४५.२४ कोटी रुपये, झज्जरसाठी २४.५१ कोटी रुपये, सोनीपतसाठी १२.२६ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. रोहतकसाठी १०.४५ कोटी रुपये, पलवलसाठी ५८.२८ लाख रुपये, नुंहसाठी ५२.०५ लाख रुपये, कर्नालसाठी ३.७८ लाख रुपये आणि गुरगावसाठी १०,००० रुपये देण्यात आले आहेत.

एमएसपीनुसार १४ पिकांची खरेदी करणारे हरियाणा एकमेव राज्य असल्याचा दावा प्रवक्त्यांनी केला. अवकाळी पाऊस आणि इतर कारणांनी शेतकऱ्यांना वारंवार नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईची रक्कम १२,००० रुपये प्रती एकरवरुन १५,००० रुपये करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय कमी भरपाईच्या स्लॅबमध्ये २५ टक्के वाढीची घोषणाही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here