पाटणा : यापूर्वी अनेकवेळा बिहारमधील उद्योग धंद्यांबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता एक नवी सुरुवात झाली आहे. राज्यात लवकरच नव्या योजनांची सुरुवात होईल. उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पाटणा येथील खादी मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी योजनांची माहिती दिली. शाहनवाज हुसेन यांनी यावेळी उद्योग संवाद पुस्तकाचे प्रकाशन केले. गेल्या एक वर्षात उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा यात घेण्यात आला आहे.
न्यूज १८ डॉट कॉमवरील वृत्तानुसार, मंत्री शाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, मार्च महिन्याच्या अंतिम आठवड्यात अथवा एप्रिलमध्ये बिहारच्या तीन जिल्ह्यात किमान चार इथेनॉल प्लांटचे उद्घाटन होईल. त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळेल. मुख्यमँत्री नितीश कुमार हे या प्लांटचे उद्घाटन करतील. उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, बिहारमध्ये अनेक प्लांट सुरू करण्याची तयारी झाली आहे. इथेनॉलचा पुरवठा कोटा १८.५० कोटी लिटरवरुन ३५.२८ कोटी लिटर झाला आहे. एप्रिलमध्ये बरौनी येथील बॉटलिंग प्लांटची सुरुवात होईल. यामध्ये फ्रूट ज्युस युनिटही असेल. गेल्या एक वर्षात बिहारमध्ये ६१४ इथेनॉल युनिटसाठी ३८ हजार कोटींचे प्रस्ताव मिळाले आहेत. एससी-एसटी उद्योग योजनेंतर्गत ३,९९९ आणि मुख्यमंत्री मागास उद्योग योजनेअंतर्गत चार हजार लोकांना रोजगार देण्यात आला आहे. तर २० स्टार्टअप्सना मंजुरी देण्यात आली आहे.