बागपत : शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर न देणे साखर कारखान्यांसाठी महाग पडू शकते. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी तीन साखर कारखान्यांच्या प्रशासनाला नोटीस जारी करून पैसे न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. जवळपास ४०० कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. नोटीस मिळाल्यानंतर कारखान्यांकडून बिले देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
जिल्हा ऊस अधिकारी कुमार यांनी सांगितले की, बागपत सहकारी साखर कारखाना आणि रमाला कारखान्याने गेल्यावर्षीची ऊस बिले दिली आहेत. मात्र, यंदाची बिले थकीत आहेत. बागपत कारखान्याकडे ३४ कोटी रुपये आणि रमाला कारखान्याकडे ५९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मलकपूर साखर कारखान्याकडे गत हंगामातील आणि चालू हंगामातील ३०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. तिन्ही कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी जर तातडीने पैसे दिले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऊसाचे पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दरम्यान बागपत, रमाला आणि मलकपूर कारखान्याने १.२५ कोटी क्विंटल उसाची खरेदी केली आहे. ऊस खरेदी आणि गाळप व्यवस्थित सुरू असल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी दिली.