फोंडा : धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याशी संलग्न २१ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्यात आली आहे. २१ शेतकऱ्यांच्या ५.७ हेक्टर क्षेत्रातील पिकाचा विचार करून ११.९ लाख रुपये देण्यात आले आहेत. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुसंख्य शेतकऱ्यांनी नारळ, सुपारी, केळीची शेती केली आहे. काणकोणमध्ये १७ शेतकऱ्यांनी ४.८५ हेक्टर क्षेत्रात सुपारी, तीळ, भाजीपाला पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सांगे तालुक्यतील कुर्डी गावात तीन शेतकऱ्यांनी ०.६ हेक्टर क्षेत्रात नारळ आणि केळी लागवड केली आहे. तर कमान सांगे येथील एका शेतकऱ्याने ०.२ हेक्टर जमिनीत भात लागवड केली आहे.
कारखाना बंद झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. ऑल शुगरकेन कल्टिव्हेटर्स असोसिएशनने गेल्यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या आपल्या बैठकीतून सरकारने नुकसानभरपाई मोजताना कारखान्याला शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या सर्वोच्च ऊस पुरवठ्याचा विचार करण्याची मागणी केली होती. २०१७-१८च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी ४७,०६९ टन ऊस पुरवठा केला होता. हा ऊस पुरवठा सर्वाधिक आहे.