लखनौ : देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात २०२१-२२ या गळीत हंगामाचा निम्मा टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र, १२० पैकी १८ कारखान्यांनी आपले खातेही उघडलेले नाही. चालू हंगामात राज्यात सरासरी ७१ टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत. यामध्ये १४ फेब्रुवारीपर्यंत ५,०५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, गेल्या हंगामाच्या, २०२०-२१ च्या तुलनेत ही ऊस बिले देण्याचे प्रमाण खूप चांगले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ८५७० कोटी रुपयांची थकबाकी होती. या हंगामात नेक कारखान्यांनी १०० टक्के ऊस बिले दिली आहेत.
याबाबत फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, चालू हंगामात १४ फेब्रुवारीपर्यंत राज्यात सरासरी ७१ टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत. ९३ खासगी साखर कारखान्यांनी ७४ टक्के पैसे दिले आहेत. तर २४ सहकारी कारखान्यांनी ४० टक्के ऊस बिले दिली आहेत. यूपी कॉर्पोरेशन सेक्टरमधील तीन कारखान्यांनी ४३ टक्के बिले दिली आहेत. ३८ साखर कारखान्यांनी शंभर टक्के बिलांना मंजुरी दिली आहे. यामध्ये बलरामपूर शुगर्सचे १० कारखाने (१०७ टक्के), बिर्ला समुहाचे चार कारखाने (१०३ टक्के), डीसीएम श्रीराम समुहाचे चार कारखाने (१०० टक्के) दामलिया समुहाचे तीन कारखाने (१०६ टक्के), धामपूर शुगर्सचे ५ कारखाने (१०५ टक्के), द्वारिकेश समुहाचे तीन कारखाने (१११ टक्के) आणि त्रिवेणी समुहाचे सात कारखाने (१०२ टक्के) यांचा समावेश आहे. त्यानंतर उत्तम समुहाच्या तीन कारखान्यांनी ९१ टक्के बिले दिली आहेत. तर वेव्ह समुहाच्या चार कारखान्यांनी थकबाकीपैकी ७५ टक्के ऊस बिले दिली आहेत.
बड्या उद्योग समुहांबरोबरच काही व्यक्तीगत कारखान्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. टिकौला कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस थकबाकीच्या ११० टक्के बिले दिली आहेत. पिलिभीत कारखान्याने १०६ टक्के, बिसवान कारखान्याने १०५ टक्के, बहराइचमध्ये परसेंडी कारखान्याने १०२ टक्के, मोतीनगरने आपल्या उसाचे १०० टक्के बिल दिले आहे. दौराला आणि अगौता कारखान्याने अनुक्रमे ९८ टक्के आणि ९१ टक्के थकबाकी दिली आहे.