रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी घोषणा केल्यानंतर रशियन सैन्याने गुरुवारी युक्रेनविरोधात कारवाई सुरू केली. ती शुक्रवारी सुरूच राहिली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाने जगभर खळबळ माजवली आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी युक्रेनमध्ये विध्वंस पाहायला मिळाला. पुतीन यांनी इतर देशांनाही सज्जड इशारा दिला आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी बजावले आहे.
दरम्यान, युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियातील अनेक शहरांमध्ये युद्धविरोधी निदर्शने सुरू झाली. या प्रकरणांत आतापर्यंत १७०० जणांना अटक करण्यात आली आहे. जगभरातही रशियाच्या हल्लेखोरीचा निषेध करण्यात येत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शेकडो आंदोलकांनी युक्रेनचे झेंडे स्वतःभोवती गुंडाळून घेऊन संयुक्त राष्ट्राच्या रशियन मिशनवर मोर्चा काढला. जगभरातील नेत्यांनी रशियाच्या आक्रमणावर टीका केली आहे. काही पूर्व युरोपातील नेत्यांनी रशियन बोर्डवरुन आपला राजीनामा सादर केला आहे. अमेरिकेने अद्याप सैन्य कारवाईची घोषणा केली नसली तरी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियावर नवे निर्बंध लादले आहेत. बायडेन यांनी बँकिंग, टेक्नॉलॉजी, एअरस्पेस या क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. त्या अंतर्गत रशियाला आता डॉलर, पाऊंड आणि युरो बरोबर व्यवसाय करता येणार नाही. फिनलंडचे माजी पंतप्रधान एक्सो अहो यांनी रशियातील सर्वात मोठी बँक सर्बैंकच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. तर ऑस्ट्रियाचे माजी नेते क्रिश्चियन केर्न यांनी रशियन रेल्वे कंपनी RZDच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला आहे. रशियाला चॅम्पियन्स लीगच्या आयोजनाची संधीही गमवावी लागणार आहे.