UNSC मध्ये रशिया विरोधात प्रस्तावावर मतदानापासून भारत अलिप्त, हे आहे कारण

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) रशियाविरोधात प्रस्ताव दाखल करण्यात आला. याविषयावर जगभरातील देशांनी मतदान केले. मात्र, भारताने या मतदानापासून स्वतःला अलिप्त ठेवले. सर्व सदस्य देशांनी मतभेद आणि वाद टाळण्यासाठी राजकीयदृष्ट्या कौशल्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत असे भारताने स्पष्ट केले आहेत. वाद सोडविण्यासाठी संवाद हाच मार्ग आहे असे भारताने म्हटले आहे. सध्याच्या काळात हा मार्ग कठीण भासू शकतो. मात्र, आम्हाला त्या मार्गावर परतण्याची गरज आहे. या सर्व कारणांमुळे भारताने या प्रस्तावावर मतदान केले नाही, असे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी स्पष्ट केले.

टी. एस. तिरुमूर्ती यांनी मतदानाबाबत भारताची भूमिका मांडताना सांगितले की, युक्रेनमधील सध्याच्या घटनाक्रमामुळे भारत अस्थिर आहे. हिंसा आणि शत्रुत्व थांबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत अशी भारताची भूमिका आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत शुक्रवारी या प्रस्तावाच्या बाजूने ११ मते पडली. चीन, भारत, संयुक्त अरब अमिरात हे देश मतदानापासून लांब राहिले. हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. कारण परिषदेचा स्थायी सदस्य देश असलेल्या रशियाने व्हेटोचा वापर केला आहे. दरम्यान, रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव यांनी शुक्रवारी सांगितले की, शेजारी देश युक्रेनवर रशिया कब्जा करू इच्छित नाही. युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे खाली ठेवल्यावर मास्को युक्रेन सोबत चर्चा सुरू करेल असे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here