Russia-Ukraine War: कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे इथेनॉल मिश्रणाला बळ मिळणार

नवी दिल्ली : युक्रेन-रशिया संघर्षानंतर पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आणि देशांतर्गत इंधन दराच्या वाढीदरम्यान, ब्रेंट क्रूडचा दर बुधवारी ११३ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचला. कच्च्या तेलाच्या किमती वाढीमुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला (ईबीपी) प्रोत्साहन मिळू शकते. देशाला आपल्या ८० टक्के तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. २०२०-२१ मध्ये तेल वितरण कंपन्यांनी ३६७२ कोटी लिटर इथेनॉल मिश्रीत इंधनाची विक्री केली. त्यातून ९५८० कोटी रुपये (१.३ बिलियन डॉलर) परकीय चलनाची बचत झाली आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ७२२ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता आहे. ती २०२५ पर्यंत १५०० कोटी लिटरपर्यंत पोहोचेल. भारतात गेल्या पाच वर्षात इथेनॉल उत्पादन वाढले आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये २.०७ टक्के पासून २०२०-२१ मध्ये ८.१० टक्क्यांपर्यंत मिश्रण पोहोचले. महागड्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग दाखविण्यास मदतीसाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी २०३० वरुन २०२५वर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट २० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.

इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, २०२०-२१ मध्ये ओएमसींना ३०२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे देशाने सरासरी ८.१० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट गाठले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, देशात आगामी आर्थिक वर्ष २०२२च्या अखेरीस १० टक्के आणि २०२५पर्यंत २० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण होईल. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि मागणी या दोन्ही घटकांनी एकत्रितरित्या काम करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here