काठमांडू : साखर कारखान्यांनी बिले थकवल्याचे सांगत शेतकरी ऊस उत्पादनापासून दूर गेले आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षात ऊसाचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाकडील (MoAD) माहितीनुसार २०२०-२१ मध्ये ऊसाचे उत्पादन १.१९ मिलियन टन झाले आहे. जे आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये २.०८ मिलियन टनापेक्षा जवळपास निम्म्यावर आले आहे.
चांगल्या प्रकारच्या बियाण्याची कमतरता, कमी उत्पादकता आणि ऊस बिले देण्यास उशीर ही यामागील प्रमुख कारणे आहेत. काही वर्षापूर्वी देशभरात दोन डझनहून अधिक साखर कारखाने सुरू होते. मात्र, ऊस उत्पादनात घसरणीमुळे आता फक्त नऊ साखर कारखाने सुरू आहेत. देशांतर्गत उत्पादनात घसरणीसह साखर आयात दरवर्षी वाढत आहे. सरकारकडील आकडेवारीनुसार नेपाळने २०१९-२० मध्ये ४.२७ अब्ज रुपयांची साखर आयात केली. त्याआधीच्या वर्षात ती ३.१२ अब्ज रुपये होती.
यांदरम्यान, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ७५.९० मिलियन रुपयांची बिले दिलेली नाहीत. सरकारी आकडेवारीनुसार श्रीराम साखर कारखाना आणि अन्नपूर्णा साखर कारखान्याने ३१.३० मिलियन रुपये, इंदिरा साखर कारखान्याने १०.६० मिलियन रुपये, हिमालयन साखर कारखान्याने २.४१ मिलियन रुपये आणि लुंबिनी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ४,२०,००० रुपये थकवले आहेत.