पिकावरील खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण करा : डॉ. राजन

फाजिल्का : फाजिल्का सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस पिक व्यवस्थापन, त्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्याबाबत बेगावाली गावात शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन केले होते. बेगावाली गावातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी सुरिदर कुमार झिंझा यांच्या शेतात झालेल्या या मेळाव्यात २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पिकावरील खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

याबाबत जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शिबिरात पंजाब कृषी विद्यापीठाचे विभागीय संशोधन केंद्र कपूरथलाचे संचालक तथा प्राचार्य डॉ. गुलजार सिंह संघेडा, वरिष्ठ संशोधक डॉ. राजन भट्ट यांसह ऊस आयुक्त डॉ. सुरजित सिंह, फरीदकोटचे सहाय्यक ऊस विकास अधिकारी नविदरपाल सिंह, परमिंदर सिंह, कारखान्याचे अध्यक्ष अश्विन कुमार, सर व्यवस्थापक कंवलजित सिंह, ऊस विभागाचे अधिकारी प्रिथी राज आदींनी सहभाग घेतला. यावेळी लुधियाना कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. गुलजार सिंह यांनी शेतकऱ्यांना उसाच्या नव्या प्रजातींविषयी माहिती दिली. उसाचे पिक चांगले येण्यासाठी योग्य बियाण्यांची निवड करावी. नव्या बियाण्यांमध्ये केपीबी ९५ आणि को ०११८ आदींचा वापर अधिकाधिका ठिकाणी करावा. नर्सरीतून बियाणे निवडावे असे मार्गदर्शन केले. वरिष्ठ संशोधक डॉ. राजन म्हणाले की, शेतकऱ्यांनी पिकावरील खर्च कमी करण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी माती परीक्षणावर भर द्यावा. मातीची शक्ती वाढावी यासाठी नवे तंत्रज्ञान वापरावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here