शामली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी फटकारले आहे. ऊस बिले देण्यास उशीर करणाऱ्या कारखान्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी शामली साखर कारखान्याचे युनिट हेड व्ही. सी. त्यागी यांना दोन तास बसवून घेऊन त्यांच्याकडे थकीत ऊस बिलांबाबत विचारणा केली. बिले अदा करण्याचे आश्वासन त्यागी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत २०२१-२२ या हंगामातील थकबाकीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ७२७.८६ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला असून १००.५८ कोटी रुपयांची बिले दिल्याचे सांगितले. शामला कारखान्याने १२.४० कोटी रुपये, ऊन साखर कारखान्याने ४७.३३ कोटी रुपये, थानाभवन कारखान्याने ४०.८५ कोटी रुपये असे शंभर कोटी रुपये दिले आहेत. शामली कारखान्याकडे २१४.५६ कोटी, ऊन कारखान्याकडे १६१.६८ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याकडे २५१.०३ कोटी रुपये थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. जिल्हातील साखर कारखान्यांनी फक्त १३.८२ टक्के बिले दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कौर यांच्यासमोर ३१ मार्चअखेर शामली कारखान्याने ३० कोटी, थानाभवन कारखान्याने ४० कोटी आणि ऊन कारखान्याने ३० कोटी रुपयांची ऊस बिले दिली जातील, असे आश्वासन दिले. ऊस विभागाचे महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया, थानाभवन कारखान्याचे युनिट हेड वीरपाल सिंह, ऊस महाव्यवस्थापक जे. बी. तोमर, सुभाष बहुगुणा, ऊन कारखान्याचे महाव्यवस्थापक अनिल कुमार अहलावत, विक्रम सिंह उपस्थित होते.