नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात तणाव वाढला आहे. भारतासह जगभरातील देशांत शेअर बाजार घसरला आहे. कच्चे तेल १०० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहे. त्यामुळे भारतासमोर अडचणी वाढल्या आहेत. यांदरम्यान, आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने (Moody’s Investors Service) चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकास दराचे अनुमान ९.५ टक्क्यांवरून ९.१ टक्क्यांपर्यंत घटवले आहे. महाग इंधन आणि खतांच्या आयातीमुळे सरकारच्या खर्चावरील ताण वाढणार असल्याचे मत मूडिजने मांडले आहे.
याबाबत एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुडीज ग्लोबल मायक्रो आऊटलूक २०२२-२३ नुसार, सर्वच देशांचे आर्थिक विकासाचे नुकसान होत आहे. २०२३ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ५.४ टक्के राहील अशी शक्यता रेटिंग एजन्सीने व्यक्त केली आहे. भारत खास करुन वधारलेल्या तेलाच्या किमतीमुळे संवेदनशील स्थितीत आहे. भारत अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पादन करतो. त्यामुळे काही काळ कृषी उत्पादन निर्यातीचा लाभ मात्र मिळू शकेल. उच्च इंधन दर, संभाव्य खतांची आयात यातून सरकारी तिजोरीवर भार पडेल असे मुडीजने म्हटले आहे.