हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर : चीनी मंडी
उसाचा पहिला हप्ता २३०० रुपये जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी आता साखर निर्यात अनुदान, बफर स्टॉक आणि ट्रान्स्पोर्टवरील २०० ते २५० रुपयांचे अनुदान वगळून दुसरा हप्ता देण्याची घोषणा केली. दुसऱ्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३५० ते ६०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील साखर कारखानदारांची महत्त्वाची बैठक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात झाली. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावर बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. तर, शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.
सध्या एखाद्या साखर कारखान्याने निर्यात केल्यास प्रतिक्विंटल १८० रुपये ८० पैसे अनुदान मिळणार आहे. तसेच बफर स्टॉक केल्याबद्दल प्रत्येक पोत्यामागे किमतीच्या १२ टक्के अनुदान मिळते. निर्यात साखरेच्या वाहतुकीसाठी प्रतिक्विंटल ८० रुपये अनुदान मिळते. साखर निर्यात, बफर स्टॉक आणि वाहतूक अनुदानाची २०० ते २५० रुपये रक्कम साखर कारखान्यांना मिळते. अनुदानाची ही रक्कम वगळून कारखानदारांनी दुसरा हप्ता देण्याची तयारी केली आहे. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, एफआरपीची उर्वरीत रक्कम केंद्राचे अनुदान मिळाल्यानंतरच मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने साखर विक्रीचा किमान दर ३१ रुपये किलो केल्यामुळे एफआरपीची रक्कम देण्यासाठी दिलासा मिळाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एफआरपी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो ३५ रुपये करावा, अशी मागणी साखर उद्योगातून होत होती आता प्रति किलो साखर कारखान्यांना दोन रुपये जादा मिळणार आहेत. तसेच साखरेच्या मूल्यांकनातही वाढ होणार असल्याने बँकांकडून कर्जाची रक्कम वाढवून मिळणार आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दबावानंतर साखर कारखान्यांनी उर्वरीत एफआरपीच्या बदली साखर देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, त्याला कितपत प्रतिसाद मिळतो याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. पण, किमान विक्री दरात झालेली वाढ आणि साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी दाखवलेली तयारी यांमुळे साखर उद्योगात आनंदाचे वातावरण आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp