पुणे : महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात उच्चांकी साखर उत्पादन होत असून राज्याने आपला प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेशला मागे टाकल्याचे दिसून येत आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात १५ मार्चअखेर १०८.९५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर उत्तर प्रदेशात १५ मार्च २०२२ पर्यंत १२० साखर कारखान्यांनी ७८.३३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
इस्माने आपल्या दुसऱ्या अग्रीम अनुमानामध्ये सुधारणा करत २०२१-२२ साठी ११७ टनांऐवजी १२६ लाख टन (इथेनॉल रुपांतरणानंतर) साखर उत्पादन होईल अशी शक्यता वर्तविली होती. महाराष्ट्रातील साखर आयुक्तालयाकडील आकेडवारीनुसार, २० मार्च २०२२ पर्यंत राज्यात १८ कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. सध्या कोल्हापूर विभागातील १४ तर नागपूर विभागातील एक कारखाना बंद झाला आहे. सोलापूर विभागातील तीन कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २० मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात एकूण १९७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. यामध्ये ९८ सहकारी तथा ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. एकूण १०७२.५८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत ११११.६४ लाख क्विंटल (१११ लाख टन) साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के आहे.