चार महिन्यानंतर आज प्रथमच पेट्रोल-डिझेल दरात वाढ

नवी दिल्ली : देशभरात चार महिन्यानंतर प्रथमच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी डिझेलच्या दरात ७६ ते ८६ पैशांची वाढ करण्यात आली. तर पेट्रोलच्या दरात ७६ ते ८४ पैशांची वाढ झाली. दिल्लीत एक लिटर पेट्रोल आता ९६.२१ रुपये तर डिझेल ८७.४७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

केंद्र सरकारने पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तेल कंपन्यांना दरवाढ करण्यास रोखल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ११२ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्यानंतर रविवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या घाऊक खरेदी दरात २५ रुपये प्रती लिटरची वाढ केली होती. किरकोळ दरात हळूहळू वाढ करण्यात येणार असल्याचे इंधन वितरकांचे म्हणणे आहे. नव्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ११०.८२ रुपये तर डिझेल ९५ रुपये प्रती लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पट्रोल १०५.५१ रुपये तर डिझेल ९०.६२ रुपये लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०२.१६ रुपये आणि डिझेल ९२.१९ रुपये लिटरने मिळत आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लखाडमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रती लिटरवर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here