बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात विजेच्या तारांतील घर्षणामुळे ठिणगी उडून ऊस पिक जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पिक जळण्याचे संकटही वाढले आहे. आमच्या शेतांवरून जाणाऱ्या विजेच्या तारांतील ठिणग्यांमुळे ऊस पिक जळत आहे असे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विविध गावांत जवळपास १२० एकर क्षेत्रातील ऊस अशा प्रकार जळून खाक झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतांमध्ये दीर्घ कालावधीपासून आणि पाणी उपलब्धतेमुळे पिकाचे उत्पादन चांगले आले होते. विजेच्या तारा ऊसाच्या शेतांमध्ये अवघ्या दोन ते तीन फुटांवरून जात आहेत. जर या तारांमध्ये घर्षण झाले तर ठिणग्या उडतात आणि अनेकवेळा पिक जळून खाक होते.
याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एमएसईडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माती घट्ट नसल्याने विजेचे खांब अनेकदा झुकण्याच्या स्थितीत येतात. अशावेळी विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यास अशा ठिणग्या उडणे शक्य आहे. २०२०-२१ या हंगामात फक्त मराठवाड्यात आगीच्या १३ घटना घडल्या होत्या. त्यामध्ये पाचजणांना ९.९९ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. मराठवाड्यासह राज्याच्या इतर विभागातही पिक जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.