बेगुसराय : राज्यात लवकरच केंद्र सरकारने मंजुरी दिलेली १७ इथेनॉल युनिट्स सुरू होतील अशी घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. बेगुसराय येथील असुरीमध्ये वरुण ब्रेवरेजीस लिमिटेडच्या पेय बॉटलिंग प्लांटचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, राज्यात आणखी औद्योगिक युनिट स्थापन केली जाणार आहेत. राज्याचे उद्योग मंत्री सैयद शाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, पेय युनिटमुळे रोजगार निर्मिती होार आहे. त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. हुसैन म्हणाले की, आम्ही वरुण बेवरेजीस लिमिटेडचे रविकांत जयपुरिया यांना आंबा, अननस, लिची यांच्या प्रक्रिया युनिट स्थापन करण्याची शक्यता तपासण्यास सांगितले आहे. राज्याच्या रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल.
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्य सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी १२९ इथेनॉल युनिट स्थापन करण्याची तयारी करत आहे. नितीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही २००८-०९ पासून औद्योगिक युनिटच्या स्थापनेस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र तत्कालीन युपीए सरकारकडून पुरेशी मदत आम्हाला मिळाली नाही. तेव्हा आम्हाला २०,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा प्रस्ताव इथेनॉल उत्पादन युनिटसाठी मिळाला होता. मात्र, आम्हाला केंद्रातील एनडीए सरकारने आता इथेनॉल युनिट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.