ऊस बिल थकबाकी ५०० कोटींच्या घरात

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पुणे : चीनी मंडी

साखरेची विक्री होत नसल्याने नगर आणि नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी वाढत चालली आहे. सहकारी व खासगी कारखान्यांकडे ऊस उत्पादकांची पाचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. जास्त थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील चार साखर कारखाने सापडले असून, त्यांच्याकडे ८२ कोटी रुपये थकीत आहेत. यात गणेश, केदारेश्वर, राहुरीतील डॉ. बा. बा. तनपुरे, जय श्रीराम या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्राबरोबर नगर आणि नाशिक जिल्ह्यातही उसाचे चांगले उत्पादन होते. पण, यंदा गाळप हंगाम सुरू झाल्यापासूनच या दोन जिल्ह्यांत ऊस थकबाकी वाढत चालली आहे. नगर जिल्ह्यातील खासगी व सहकारी कारखान्यांनी मिळून आतापर्यंत तब्बल १ कोटी १२ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. अजून महिनाभर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उत्पादनात आणखी भर पडणार आहे. अंबालिका या खासगी कारखान्याने आत्तापर्यंत सर्वाधिक १३ लाख ६९ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तर थोरात सहकारी कारखान्याने नऊ लाख ५३ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

गेल्या महिन्यात ३५० कोटी थकबाकी असलेल्या दोन जिल्ह्यांमध्ये थकबाकीने ५०० कोटींचा आकडा गाठला आहे. दोन जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना ‘एफआरपी’चे १ हजार ७८१ कोटी रुपये दिले आहेत. ज्ञानेश्वर, कोपरगाव, मुळा, संगमनेर, संजीवनी या सहकारी कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे सर्व पैसे वेळेत दिले आहेत. दुसरीकडे चांगले गाळप झालेल्या अंबालिका या खासगी कारखान्याने ८८ कोटी रुपये थकविले आहेत. विखे-पाटील कारखान्याकडे ८० कोटी रुपये थकबाकी आहे. कारखाने ऊस तोडून नेतात. मात्र पैसे देण्यासाठी अनेक महिने थांबवतात, अशी तक्रार राहुरी येथील दवणगावचे शेतकरी राधू खपके यांनी केली आहे. तनपुरे कारखान्याला २०१३च्या गाळपासाठी १०६ टन ऊस दिला होता. त्यापोटी कारखान्याकडून सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम मिळणार होती. त्यातली निम्माहून अधिक रक्कम कारखान्याकडून मिळालेली नाही असे त्यांनी सांगितले.

दरम्यान,  साखर आयुक्तालयाने एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यात गणेश, केदारेश्वर, तनपुरे, जय श्रीराम या कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. गणेश कारखान्याकडे १७ कोटी ६१ लाख, ‘केदारेश्वर’कडे २० कोटी, ‘तनपुरे’कडे २७ कोटी ६६ लाख, ‘जय श्रीराम’ कारखान्याकडे १६ लाख ६४ लाख रुपये थकबाकी आहे. सुरुवातीला या कारखान्यांची साखर, बगॅस व इतर उपपदार्थ विक्री करून पैसे दिले जाणार आहेत. त्यानंतर थकबाकी राहिल्यास कारखान्यांची स्थावर मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागणार आहे.

एफआरपी थकवलेले कारखाने

कारखाना थकबाकी

अंबालिका ८८ कोटी ६ लाख

गंगामाई २१ कोटी ७८ लाख

प्रवरा ८० कोटी ७३ लाख

कुकडी २७ कोटी ९३ लाख

अगस्ती १३ कोटी ९४ लाख

अशोक १० कोटी ५८ लाख

केदारेश्वर २८ कोटी १८ लाख

गणेश २१ कोटी ५८ लाख

 

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here