जालना : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केले. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यातील इथेनॉल प्लांटच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी हे देशाचा आर्थिक कणा आहेत. त्यामुळे त्यांनी चांगल्या गुणवत्तेचे बियाणे, नकदी पिकांची शेती करण्याची गरज आहे.
पवार म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक प्रमुख संस्था आहे, ज्याच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे, अनेक कृषी पूरक घटकांची मदत केली जाते. ते म्हणाले, या संस्थेची जालना जिल्ह्यात एक शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १०५ एकर जमिनही खरेदी करण्यात आली आहे. पवार म्हणाले की, या संस्थेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील नवोदित युवकांना आवश्यक ते तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाईल. त्यांना रोजगार संधी प्राप्त होतील, याची दक्षता घेऊ. या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आदी उपस्थित होते.